दक्षिण मुंबईतील एका २५ वर्षीय महिलेला डॉक्टरच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्याचे अश्लील फोटो पोस्ट केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. डीबी मार्ग पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले असून, तिने सूडबुद्धीने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
तक्रारदार डॉक्टर हे एका नामांकित रुग्णालयात कार्यरत आहेत. १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या एका महिला मित्राने त्यांना कॉल करून त्यांच्या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फॉलो रिक्वेस्ट आल्याची माहिती दिली. संशय आल्याने डॉक्टरने अकाउंटची तपासणी केली असता, त्यावर त्यांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पोस्ट करण्यात आल्याचे आढळले.
तपासादरम्यान, डॉक्टरच्या नावाने अनेक बनावट खाते तयार करण्यात आल्याचे दिसून आले. या खात्यांवरून आक्षेपार्ह फोटो अपलोड करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा हेतू ठेवूनच करण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टरने तात्काळ डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, सदर इंस्टाग्राम अकाउंटसाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक आणि आयपी अॅड्रेसचा मागोवा घेतला. त्यानंतर, संबंधित महिलेचा शोध घेऊन पोलिसांनी दक्षिण मुंबईतील तिच्या निवासस्थानी जाऊन तिला ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले की, “चौकशीत आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे. डॉक्टरसोबत तिचे काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडे डॉक्टरने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने तिने त्याला धडा शिकवण्याच्या हेतूने हा कट रचला आणि बनावट अकाउंटद्वारे त्याचे मॉर्फ केलेले फोटो प्रसारित केले.”
पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेला मोबाईल फोन आणि बनावट अकाउंटसाठी वापरलेले सिम कार्ड जप्त केले आहे. तसेच, आरोपी महिलेने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बनावट खाती तयार केली आहेत का, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावर नोंदणीकृत असल्याने या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियाद्वारे कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply