मुंबईतील वाहतूक कोंडीला तोडगा ठरलेला महत्त्वाकांक्षी “कोस्टल रोड प्रकल्प” अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. या प्रकल्पामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक दरम्यानचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी वरळी ते वांद्रे सी लिंक उत्तर मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कोस्टल रोड हा पर्यावरणपूरक तसेच इंधन आणि वेळेची बचत करणारा प्रकल्प असून, १४ हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पाला मुंबईचे भूषण म्हणता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचे कौतुकही केले.
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे; भूमिगत प्रवासाचा अनुभव देणारा
हा मार्ग सोमवारपासून सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत प्रवासासाठी खुला होणार आहे. भूमिगत मार्गाचा अत्याधुनिक अनुभव घेण्यासाठी प्रवाशांनी उत्सुकता दाखवली आहे. याशिवाय प्रकल्पातील ७० हेक्टर क्षेत्रावर हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे.
लोकार्पण सोहळ्यात वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, आणि लोटस जंक्शन भागात ये-जा करण्यासाठी तीन आंतर मार्गिकाही उघडण्यात आल्या. या रस्त्यांमुळे मरीन ड्राईव्ह, बिंदू माधव ठाकरे चौक, आणि वांद्रे सी लिंक यामधील प्रवास सुलभ होणार आहे. प्रकल्पातील ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्ता फेब्रुवारीअखेर खुला होईल.
दक्षिण मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोस्टल रोड हा मोठा दिलासा ठरणार आहे. १०.५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर दररोज १८-२० हजार वाहने प्रवास करत असून, मार्च २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान ५० लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे वेळेत काम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले. कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार असल्याचे त्यांनी नमूद केले. किनारी रस्त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामामुळे प्रवाशांना परदेशातील रस्त्यांचा अनुभव मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वरळी ते वांद्रे सी लिंक दरम्यानचा १२ मिनिटांचा प्रवास हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा बदल घडवून आणणार आहे… त्याचे स्वागत झाले पाहिजे.
Leave a Reply