बीड: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे फाट्याजवळ ७ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता एका भीषण अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय ३३, रा. जातेगाव फाटा, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन शेळके हे दुचाकीवरून (एमएच १६ डीजे ३७६५) पुणे-नगर महामार्गावरील पळवे शिवारात असलेल्या सह्याद्री हॉटेलजवळून जात होते. त्याचवेळी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस चालवत असलेल्या चारचाकी (क्रमांक एमएच २३ बीजी २९१९) वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघाताच्या वेळी सागर सुरेश धस (रा. आष्टी, जि. बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तावडेवाडी, ता. आष्टी) हे दोघे गाडीत होते.या अपघातामुळे नितीन शेळके यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांच्या चुलत भावांना (अमोल अशोक शेळके, सतीश प्रकाश शेळके आणि नीलेश अशोक शेळके) फोन करून माहिती देण्यात आली. नितीन यांना तातडीने सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सोमवारी रात्री सुपा पोलिस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर, मंगळवारी मयताचे चुलत भाऊ स्वप्निल पोपट शेळके (वय १९, रा. जातेगाव फाटा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चालक सागर सुरेश धस याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर धसला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर धस यांच्या गाडीची नंबर प्लेट काढून ती सुपा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.
Leave a Reply