मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा ‘कै. काकासाहेब पुरंदरे पत्रकारिता पुरस्कार’ यंदा झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे १५ एप्रिल रोजी आयोजित सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार सोपवण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुतार यांचे अभिनंदन करत त्यांच्या निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारितेचे कौतुक केले. “चांगली पत्रकारिता करण्याची तुमची खुमखुमी अशीच कायम राहो,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेहमीच्या राज शैलीत भाष्यही केले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांची आठवण काढली. “आचार्य अत्रे यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याची कायम खंत राहिली. मात्र काकासाहेब पुरंदरे यांच्या सहवासातून त्यांच्या अनेक आठवणी ऐकायला मिळाल्या,” असे ते म्हणाले. अत्रे यांच्या काळातील धारदार पत्रकारिता आजच्या काळात शक्य नसल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अॅड. आरती पुरंदरे सदावर्ते यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र पै (आचार्य अत्रे यांचे नातू) उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ संपादक महेश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानत सोहळ्याची सांगता केली. एकूणच, पत्रकारितेतील प्रबोधनात्मक कार्याचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Leave a Reply