परीक्षांच्या काळात पुन्हा एकदा नवा वाद! भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. परीक्षांचा पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने आयोजन व्हावे, या हेतूने त्यांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे.
नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून आपली मागणी स्पष्ट केली आहे. “बुरखा परवानगीमुळे परीक्षा हॉलमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. सुरक्षा धोक्यात येऊ शकते,” असे राणे यांचे म्हणणे आहे. त्यांनी हेही सुचवले की, आवश्यक असल्यास महिला पोलीस अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तपासणी केली जावी. परीक्षा पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार टाळावे, हा या मागणीमागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. राणे पुढे म्हणाले की, “बुरखा घातल्यास इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा इतर साधनांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुचित घटना घडल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.” ११ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे राणे यांच्या या मागणीवर शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मागणीमुळे परीक्षेच्या काळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि परीक्षांची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी काय पावले उचलली जातात, याची उत्सुकता आहे. राणे यांच्या या प्रस्तावावर राज्यातील शिक्षणतज्ञ, पालक, आणि विद्यार्थ्यांचे मत काय असेल, याची प्रतीक्षा आहे. शालेय शिक्षण विभागाने यावर काय निर्णय घेतला, यावरच पुढील घटनाक्रम अवलंबून आहे.

बुरखा घालून परीक्षा केंद्रावर येणाऱ्यांना बंदी करा; मंत्री नितेश राणेंची मागणी
•
Please follow and like us:
Leave a Reply