घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : ८४ लाख रुपयांच्या देयकाचा हिशेब आरोपीला देता आला नाही – पोलिसांचा खुलासा

२०२४ मध्ये घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू आणि ७४ जणांच्या जखमी होण्याच्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्शद खानला ८४ लाख रुपयांच्या व्यवहाराचा हिशेब देता आला नाही, असे मुंबई पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे यांना औषधांच्या पुरवठ्यासाठी ८४ लाख रुपये दिल्याचा दावा अर्शद खानने केला होता, मात्र तो हा दावा सिद्ध करण्यात अपयशी ठरला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, यात निलंबित अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद यांच्या पत्नीच्या कथित व्यावसायिक भागीदार असलेल्या अर्शद खानविरोधात आरोप लावण्यात आले आहेत.
१४ मे २०२४ रोजी घाटकोपर पूर्व येथे होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू, तर ७४ जण जखमी झाले. इगो मीडिया या कंपनीचे बेकायदेशीरपणे उभारलेले होर्डिंग परवानगीपेक्षा जवळपास तिप्पट मोठे होते. चौकशीत हे होर्डिंग रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आल्याचे आणि त्यासाठी तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त खालिद यांनी परवानगी दिल्याचे आढळले. अर्शद खानने इगो मीडियाकडून घेतलेल्या ८४ लाख रुपयांचा कोणताही कायदेशीर हिशेब सादर केला नाही. पोलिसांनी त्याच्या मोबाईल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांची तपासणी केली असता अनेक अनियमितता आढळल्या. खानने त्याच्या पत्नी, मेहुणा, पुतण्या आणि शेजाऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून चेक वटवल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे, तर गोवंडीतील काही स्थानिकांना कमिशनच्या बदल्यात त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास प्रवृत्त केले. अर्शद खान सात महिने फरार होता आणि डिसेंबर २०२४ मध्ये लखनौमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, तो ८४ लाखांच्या व्यवहाराचे योग्य समर्थन करू शकला नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी २० साक्षीदारांचे जबाब आणि सात अन्य जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत न्यायालयात नोंदवले. या धक्कादायक गैरव्यवहारामुळे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. पोलिस पुढील तपास करत असून, या प्रकरणात आणखी कोणाची जबाबदारी ठरते, हे लवकरच स्पष्ट होईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *