मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाने भारतातील आपल्या प्रवेशाला वेग देत मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे पहिले शोरूम सुरू करण्यासाठी करार केला आहे. या शोरूमसाठी व्यावसायिक जागेसाठी सर्वाधिक भाडेपट्टा निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. प्रॉपर्टी मार्केटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला बीकेसीमधील एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे ४,००० चौरस फूट जागा भाड्याने घेत आहे, जिथे त्यांच्या विविध इलेक्ट्रिक कार मॉडेल्सचे प्रदर्शन केले जाणार आहे.
दरमहा 35 लाख रुपये भाडे
या जागेसाठी टेस्ला दरमहा सुमारे ३५ लाख रुपये म्हणजेच प्रति चौरस फूट ९०० रुपये भाडे भरणार आहे. हा भाडेपट्टा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनी लवकरच दिल्लीतील एरोसिटी कॉम्प्लेक्समध्ये दुसरे शोरूम उघडण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची वेळ देखील महत्त्वाची मानली जात आहे.
काही आठवड्यांपूर्वीच कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारतात टेस्लाने १३ नवीन नोकऱ्यांसाठी जागा भरतीसाठी जाहिराती दिल्या, यामुळे कंपनी भारतीय बाजारात आपला विस्तार करण्याच्या दिशेने गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराबाबत अधिक स्पष्टता आवश्यक
फेब्रुवारी महिन्यातील या हालचालींवरून अंदाज लावता येतो की, टेस्ला भारतात लवकरच आपली उत्पादने अधिकृतपणे लाँच करू शकते. मात्र, यासाठी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराबाबत अधिक स्पष्टता आवश्यक आहे.
सध्या भारत सरकार आयात केलेल्या वाहनांवर ११०% कर लावते, त्यामुळे टेस्लाला येथे स्थानिक उत्पादन प्रकल्प उभारावा लागणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी भारतातील उच्च कर प्रणालीमुळे येथे कार विक्री करणे कठीण असल्याचे मत मांडले होते. एलोन मस्क यांनीही भारतासाठी कमी आयात कराच्या प्रस्तावावर भर दिला असून, त्यांच्या सुचनेनंतर केंद्र सरकारने नवीन धोरणावर विचार सुरू केला आहे. जर सरकार टेस्लाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असेल, तर कंपनी भारतात आपल्या उत्पादन आणि विक्रीच्या विस्तारासाठी आणखी पुढील पावले उचलू शकते.
Leave a Reply