मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. चिंग लिंग चुंग चियांग या देखील आता आरोपी असणार आहेत. त्यांना आरोपी करण्याची सरकारी पक्षाने केलेली मागणी विशेष न्यायालयात मान्य केली.डॉ. पायल यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आरोपींनी डॉ.पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवले, असा दावा सरकारी पक्षाने उपरोक्त मागणी करताना केला होता.
मूळ आरोपींना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
या प्रकरणात आधीपासूनच डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी त्यांनी विशेष न्यायालयात स्वतःला दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने ती मागणी फेटाळली.
डॉ. पायल तणावाखाली होत्या आणि कामाच्या ताणामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा दावा करत स्वतःवरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांना डॉ. पायल अनुसूचित जमातीतील असल्याची कोणतीही कल्पना नव्हती आणि त्यामुळे जातीय कारणावरून छळ केल्याचा आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला.
२२ मे २०१९ रोजी डॉ. पायल तडवी यांनी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर सातत्याने जातिवाचक शेरेबाजी केली जात होती आणि मानसिक छळ केला जात होता, त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल केला असून, आता मुख्य आरोपींसोबतच डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांच्यावरही कारवाई होणार आहे.


Leave a Reply