पुण्यातील हिंजवडी बस जळीतकांड प्रकरणात मोठा खुलासा! सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं धक्कादायक सत्य

पुण्यातील हिंजवडी (Pune Hinjwadi Bus Fire) येथे झालेल्या बस जळीतकांडाने अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. टेम्पो ट्रॅव्हल्सला अपघाताने आग लागली नसून, चालकाने रागाच्या भरात बस पेटवल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. या घटनेत चार निष्पाप जणांचा बळी गेला असून, आरोपी चालकावर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक जनार्दन हंबर्डीकर याने १ लिटर बेंझिन वापरून बस पेटवल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याने व्युमा ग्राफिक्स कंपनीमधून एकूण ५ लिटर बेंझिन आणल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. हिंजवडी पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, उरलेलं ४ लिटर बेंझिन नेमकं कुठे गेलं? आणि त्याचा काय वापर करणार होता? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. बसमध्ये असलेल्या इमर्जन्सी एक्झिटजवळ अडथळा निर्माण करण्यात आला होता. गाडीच्या मूळ डिझाइननुसार तिथे तीन सीट्स असायला हव्या होत्या, पण त्या ठिकाणी चार सीट्स बसवण्यात आल्या होत्या. हा बदल नेमका कोणी आणि कशासाठी केला? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ही चौथी सीट नसती, तर आपत्कालीन दरवाजा उघडता आला असता आणि चार कर्मचाऱ्यांचा जीव वाचू शकला असता!

बेंझिन किती ज्वलनशील आहे, याची जाणीव व्युमा ग्राफिक्स कंपनीला नक्कीच होती. मात्र, त्यांनी बेंझिनचा पुरेसा साठा ठेवल्याचं, तसेच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अनधिकृतरित्या चौथी सीट बसवल्याचं दुर्लक्ष केलं. या दोन मोठ्या चुकींमुळे चार निष्पाप कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे व्युमा ग्राफिक्स कंपनीतील आणखी कोण जबाबदार आहे? आणि कोणावर गुन्हा दाखल होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

या घटनेमागील कारण अधिक धक्कादायक आहे. चालक हंबर्डीकरचा पगार आणि दिवाळी बोनस थकवण्यात आला होता. तसेच, त्याच्याकडून मजुरांचेही काम करून घेतले जात होते. त्यामुळेच त्याने रागाच्या भरात हा भयंकर कट रचला. मात्र, त्याचा कट अयशस्वी ठरला. ज्या लोकांना तो मारू इच्छित होता, ते वाचले, पण चार निष्पाप जणांचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले कर्मचारी शेवटच्या क्षणापर्यंत जीवनासाठी झगडत होते. बसच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते, काचांवर तुटफुट दिसून येत होती. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, पण तो उघडला गेला नाही. या दुर्घटनेनंतर बसच्या कोपऱ्यात जळालेल्या चपला, जेवणाचे डबे आणि कोळसामय झालेले सीट दिसत होत्या. बसच्या आतील धातूसुद्धा वितळला होता, यावरून या आगीची भीषणता स्पष्ट होते. हिंजवडी पोलिस आता व्युमा ग्राफिक्स कंपनीतील आणखी कोण जबाबदार आहे? चालकाने आणलेलं उरलेलं ४ लिटर बेंझिन कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. या प्रकरणात आणखी अटक होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *