मुंबई आहे विसरभोळ्यांचे शहर; उबर कंपनीचा अनुभव

टॅक्सी सेवा देणाऱ्या ‘उबर’च्या नवव्या वार्षिक ‘हरवलेली आणि सापडलेली वस्तू’ निर्देशांकानुसार, मुंबई हे भारतातील सर्वात मोठं विसरभोळं शहर म्हणून दिल्लीला मागे टाकलं आहे. या अहवालात अनेक मौल्यवान वस्तू उबर प्रवासात मागे राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे, ज्यामध्ये लग्नाची साडी, सोन्याचे बिस्किट, २५ किलो गायीचे तूप आणि अगदी स्वयंपाकाचा स्टोव्ह यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिल्ली या यादीत आघाडीवर होती, मात्र यंदा मुंबईने ती गाठ घेतली आहे. या निर्देशांकात प्रवाशांनी वारंवार विसरलेल्या वस्तू, कोणती शहरे सर्वाधिक विसराळू ठरली, कोणत्या वेळेत आणि दिवशी विसरण्याची शक्यता सर्वाधिक असते, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. पुणे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर बेंगळुरू व कोलकात्याचा क्रम लागतो. दुसरीकडे, हैदराबाद हे देशातील सर्वात कमी विसरभोळं महानगर ठरले आहे.

२०२४ साली संपूर्ण भारतात उबरच्या प्रवाशांनी सर्वाधिक विसरलेल्या वस्तूंमध्ये पिशव्या, इअरफोन, मोबाइल फोन, पाकिटे, चष्मे, चाव्या आणि कपडे यांचा समावेश आहे. तसेच अनेक प्रवाशांनी पासपोर्टदेखील उबरमध्ये विसरल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, काही प्रवाशांनी अतिशय अनोख्या वस्तू मागे ठेवलेल्या आहेत. उदा. लग्नाची साडी, सोन्याचं बिस्किट, २५ किलो गायीचं तूप, स्वयंपाकाचा स्टोव्ह, व्हीलचेअर, बासरी, केसांचा विग, दुर्बीण, अल्ट्रासोनिक कुत्र्यांच्या भुंकण्यावर नियंत्रण ठेवणारे उपकरण आणि अगदी हवन कुंडसुद्धा!

शनिवार हा आठवड्यातील सर्वात विसरभोळा दिवस ठरला असून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वाधिक वस्तू हरवतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विसरलेल्या वस्तूंमध्ये लाल रंगाच्या वस्तू सर्वाधिक असून, त्यानंतर निळ्या व पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत. याशिवाय, सॅमसंग मोबाईल वापरणाऱ्या प्रवाशांनी त्यांचे फोन सर्वाधिक हरवले आहेत, असाही नमुना दिसून आला आहे. सणासुदीच्या काळात विसरण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. विशेषतः ३ ऑगस्ट (शिवरात्री) आणि १० मे (अक्षय तृतीया) या दिवशी हरवलेल्या वस्तूंचा उल्लेख करण्यात आला आहे.

“आपण सर्वांनी कधी ना कधी तो क्षण अनुभवला आहे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण एखादी महत्त्वाची वस्तू कॅबमध्ये विसरली आहे. उबरने हे हरवलेले साहित्य पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया अॅपच्या माध्यमातून सुलभ केली आहे,” असं उबर इंडिया साउथ एशियाचे ग्राहक व विकास विभागाचे संचालक शिवा शैलेंद्रन यांनी सांगितलं. “रायडर्सनी आम्हावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. हरवलेल्या वस्तू परत मिळवण्याची माहिती देण्यासाठी हा योग्य क्षण आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *