दादर पश्चिम परिसरात वाढत चाललेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही महापालिका व पोलीस प्रशासन कारवाई करण्यात निष्क्रिय राहिले असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, केळकर मार्ग, वीर कोतवाल उद्यान परिसर, रानडे मार्ग, गोल हनुमान मंदिर चौक आणि कबुतरखाना परिसरात रस्त्यांवर हातगाड्या, बाकडे लावून फेरीवाल्यांनी बिनधास्तपणे अतिक्रमण केले असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाजवळ दीडशे मीटर परिसरात कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी ती कारवाई फक्त प्रतीकात्मक राहिल्याची टीका स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. विशेषतः केळकर मार्ग आणि खांडके बिल्डिंग परिसरातील अतिक्रमण अजूनही तसेच असल्याचे व्यापारी संघाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर दादर व्यापारी संघटनेने वनिता समाज हॉल येथे एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आणि महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा, कॉलेज, मंडई आणि रेल्वे स्थानक परिसरातील १०० ते १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
दादर व्यापारी संघाचे पदाधिकारी सुनील शाह यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना सांगितले, “आम्ही व्यापारी आहोतच, पण त्याचबरोबर या परिसराचे रहिवासीही आहोत. रस्त्यावरचे अतिक्रमण आता असह्य झाले आहे. विशेषतः प्रभादेवी येथील पूल पाडण्यात येत असल्याने टिळक पुलावरील वाहतूक अधिकच वाढेल. जर फेरीवाल्यांना रस्त्यावर मोकळीक देण्यात आली, तर ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल.”
शाह पुढे म्हणाले, “प्रशासनाला जर फेरीवाल्यांवर कारवाई करायची नसेल, तर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. मात्र जे विक्रेते सरळ रस्त्यावर व्यवसाय करत वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत, त्यांच्यावर तरी तातडीने कारवाई व्हायला हवी.” व्यापारी संघटनेने प्रशासनाकडे आर्जव करून सांगितले की, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे. वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, प्रशासनाने या समस्येवर तातडीने ठोस पावले उचलावीत, ही त्यांची ठाम मागणी आहे.


Leave a Reply