राज्यात गणेशोत्सव म्हटला की पहिलं नाव घेतलं जातं ते पेणचं. देशभर प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदा पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींवरील बंदीमुळे मोठं संकट कोसळलं आहे. तयार झालेल्या लाखो मूर्तींचं काय करावं, असा प्रश्न सध्या येथील मूर्तिकारांपुढे उभा ठाकला आहे.
पेणचा मूर्ती व्यवसाय किती मोठा?
पेण शहर व परिसरात ५५० हून अधिक मूर्ती कार्यशाळा असून, दरवर्षी सुमारे ३५ लाख गणेशमूर्ती तयार होतात. या व्यवसायातून सुमारे ८० कोटींची उलाढाल होते आणि २३ ते २४ हजार लोकांना रोजगार मिळतो. राज्यभरात वितरित होणाऱ्या मूर्तींपैकी निम्म्या मूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात.
यावर्षी काय वेगळं घडलं?
गणेशोत्सव संपताच पुढील वर्षाच्या तयारीसाठी मूर्ती निर्माणाचं काम सुरू होतं. शाडू माती आणि पीओपी या दोन माध्यमांतून ३५० हून अधिक प्रकारच्या मूर्ती तयार होतात. यंदा १० लाखांहून अधिक मूर्ती तयार झाल्या असताना, पीओपी मूर्तींवर बंदी लागल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत आले आहेत. कर्ज काढून तयार केलेल्या या मूर्ती विकल्या गेल्या नाहीत, तर कर्जफेड करणे अशक्य होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
बंदीचं मूळ कारण काय?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१० व २०२० मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न विघटनशील मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली होती. या नियमांची अंमलबजावणी न झाल्याने पर्यावरण संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
पीओपी मूर्तींवर फक्त महाराष्ट्रातच बंदी?
मूर्तिकारांचा दावा आहे की, गुजरात, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये पीओपीवर कुठलीही बंदी नाही, मात्र केंद्रीय नियमावली ही देशभर लागू आहे. महाराष्ट्रात पर्यावरणवादी संघटनांच्या याचिकांमुळे न्यायालयीन कारवाई झाली आणि बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
काय बंदी उठवली जाऊ शकते?
पेणमध्ये तयार झालेल्या १० लाखांहून अधिक पीओपी मूर्ती विक्रीसाठी तयार आहेत. त्यामुळे यावर्षी तरी राज्य सरकारकडून काहीसा दिलासा मिळेल आणि विक्रीला परवानगी मिळेल, अशी आशा मूर्तिकार व्यक्त करत आहेत. विधिमंडळात यावर चर्चा झाली असून, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मूर्तिकार संघटनांनीही याचिकांचा मार्ग अवलंबलेला आहे.
खरंच पीओपीमुळे प्रदूषण होते का?
पीओपीचे नैसर्गिकदृष्ट्या विघटन होत नाही. नदी तलावात विसर्जन केल्यास दीर्घकाळ ते तसेच राहते. पीओपीमधील सल्फेट हा घटक जल परिसंस्थेवर परिणाम करू शकतो. मातीमध्ये पीओपी मिसळल्यास मातीचा पोत बिघडतो, मातीची पोषण मूल्य कमी झाल्याने उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करू नये असे सांगितले जाते. मात्र मूर्तिकार वापरतात त्या पीओपीमुळे प्रदूषण होते हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
Leave a Reply