पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय; मनसैनिक काश्मीरला जाणार

काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन 26 भारतीयांचा जीव घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर, दुसरीकडे आता मनसेने देखील दहशतवादी कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत मनसेचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहशतवादी कृत्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संदीप देशपांडे यांनी म्हटले की, ”जशी काश्मीरमध्ये सुबत्ता वाढली, पर्यटकांची संख्या वाढली, तसतशी अतिरेक्यांच्या भरतीची फॅक्टरी बंद पडू लागली. हीच भीती दहशतवाद्यांना छळत आहे आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा हिंसेचा मार्ग पत्करला,” असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर मनसेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मनसैनिकासाठी काश्मीरची एक सहल आयोजित केली जाणार असल्याचे देशपांडे म्हणाले.

आम्ही एक मोठा गट घेऊन काश्मीरला जाणार आहोत. पर्यटन खिळून राहता कामा नये. दहशतवादाला पर्यटनांने उत्तर देणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. संदीप देशपांडे यांनी पुढे म्हटले की, “काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आम्हाला देशात कुठेही जायला भीती वाटू नये, हेच आमचे म्हणणे आहे. देश म्हणून आपण एकत्र येऊन काश्मिरी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असा संदेश देत मनसेने या आंदोलनाची सुरुवात स्वतःपासून केली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *