मुंबई – सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली असून, दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आमदार असल्यामुळे मारहाण करण्याचा परवाना मिळत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने बच्चू कडू यांना फटकारले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नवरदे यांनी हा निकाल दिला. न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. उच्च न्यायालयात अपील दाखल होईपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असून, त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणे, हल्ला करणे, तसेच भारतीय दंड विधान कलम ५०६ (धमकी देणे) या गुन्ह्याखाली न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले आहे. मात्र, अपमानजनक भाषा वापरल्याच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
ही घटना सात वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी बच्चू कडू आमदार होते. सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू होती. आता या प्रकरणी निकाल जाहीर झाला असून, न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आता बच्चू कडू उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
Leave a Reply