मुंबईकरांच्या प्रवासाला आता स्मार्ट टेक्नोलॉजीची जोड मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईवासीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली. येत्या काही दिवसांत ‘मुंबई 1’ नावाचं एकसंध स्मार्ट कार्ड लॉंच होणार असून, या एका कार्डने मेट्रो, मोनो रेल, लोकल ट्रेन आणि बसमधून सहज प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या कार्डची रचना पुढील एका महिन्यात अंतिम केली जाईल. यामुळे प्रवाशांना विविध तिकीटांपासून मुक्ती मिळेल आणि प्रवास अधिक वेगवान, सुलभ होईल.”
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी देखील महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी शेअर केल्या. ते म्हणाले की, राज्यात सुमारे १.७३ लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प सुरू असून, यावर्षी आणखी २३,७७८ कोटींच्या नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये २३८ नवीन एसी लोकल गाड्यांचाही समावेश आहे, ज्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल.
या स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांच्या रांगा टाळता येणार आहेत. फडणवीस म्हणाले, “हे कार्ड म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे वेळ वाचेल, तणाव कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुकर बनेल.रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईसाठी खास १७ हजार कोटी रुपयांचे विविध रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे मुंबईतील रेल्वे व्यवस्था अत्याधुनिक रूप घेणार असून, प्रवाशांचा अनुभव अधिक दर्जेदार होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गालाही मंजुरी मिळाल्याचं जाहीर केलं. या मार्गामुळे विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामधील संपर्क अधिक मजबूत होणार असून, केंद्र सरकार यासाठी ४,१९० कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. इतकंच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनसुद्धा सुरू करण्यात येणार आहे.या ऐतिहासिक ट्रेन प्रवासामध्ये प्रवाशांना शिवकालीन किल्ले आणि महत्त्वाची ठिकाणं पाहता येणार आहेत, ज्यामुळे राज्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
Leave a Reply