छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने पुढाकार घेतला असून, आक्रमक हिंदुत्वाचा झेंडा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतीच औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा वादळ उठवत कबर उखडून टाकण्याची भूमिका मांडली होती. आता त्यात भर घालत, खुलताबादचं नामांतर ‘रत्नपूर’ करण्याची मागणी त्यांनी पुढे आणली आहे.
खुलताबाद हेच औरंगजेबाच्या कबरीचं ठिकाण, त्यामुळे या भागातील नाव बदलण्याचा मुद्दा पुन्हा पेटणार हे स्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गावांच्या नावांमध्ये बदल करण्याची मागणी काही काळांपासून सुरू आहे. ज्या गावांची अंत्याक्षरे बाद अशी आहेत, त्या सर्व गावांची नावे बदलण्याची भूमिका घेतली असल्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान, रा.स्व.संघाने ‘औरंगजेब’ हा इतिहासापुरता सीमित असल्याचं स्पष्ट केल्यानंतर भाजप नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते अजूनही याच मुद्द्यावरून ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची नवीन मांडणी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर त्यांनी डाव मांडला होता. मात्र उमेदवार पराभूत झाल्याने, पूर्वीप्रमाणे आक्षेपार्ह भाष्य करण्यापेक्षा आता ‘संवेदनशील हिंदुत्वा’चा मार्ग स्वीकारावा लागत आहे.
रामनवमी, गुढीपाडवा यांसारख्या सणांमध्ये हिंदू जनजागृती यात्रा, शुभेच्छांचे फलक हे ‘हिंदुत्व सोडलं नाही’ असा संदेश देण्यासाठी वापरले जात आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यात्रा काढली, तर अंबादास दानवे यांनी शहरातील चौकात मोठे शुभेच्छा फलक लावले. संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यासारखे शिंदे समर्थक नेते सातत्याने ठाकरे गटाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोपऱ्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग निर्माण करून, खुलताबादचं नाव रत्नपूर करण्याची मागणी करून, राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न शिरसाट सातत्याने करत आहेत.
दरम्यान, शहरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, नागरिक दर १५ दिवसांनी पाणी मिळण्याच्या संकटाशी झुंजत आहेत. न्यायालयांमधून प्रशासनाला रोज फटकारे बसत आहेत. तरीही शहरातील नेते ‘हिंदुत्वावर कोण आक्रमक?’ याचीच चढाओढ लावण्यात मग्न असल्याची तिखट प्रतिक्रिया शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. शिरसाट मात्र मागे हटण्याच्या मूडमध्ये नाहीत. गेले पंधरा दिवस ते सतत सांगत आहेत की, “एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी आक्रमक हिंदुत्ववादी शिवसेना आहे.
Leave a Reply