मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक आर्थिक निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांमुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाला वेग मिळणार, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम’ या कार्यक्रमात हे सामंजस्य करार झाले. या मंचावर बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दररोज नवे दरवाजे उघडत आहोत.
पुण्यात उभारणार मॅग्नम ग्लोबल सेंटर
या कार्यक्रमात जागतिक पुरवठा साखळीतील युनिलिव्हर कंपनीच्या ‘मॅग्नम आईस्क्रीम’ व्यापारासाठी पुण्यात एक ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारण्याचा करारही करण्यात आला. या प्रकल्पात ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
फडणवीस म्हणाले, आम्ही केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळही निर्माण करत आहोत. यासाठी ‘कौशल्य विद्यापीठ’ सध्या कार्यरत आहे. हरित व स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित इनोव्हेटिव्ह उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. एमएमआर क्षेत्राला ३०० अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Leave a Reply