मुंबईच्या उपनगरात असलेल्या डोंबिवलीतील तीन पोलिसांनी उत्तर प्रदेशात चक्क वीटभट्टीत कामगार बनून दरोड्याचा गुन्हा उकलला! दोन वर्षांपूर्वी, घरफोडीप्रकरणी संशयित असलेल्या राजेश राजभर या आरोपीचा शोध घेण्यासाठी हे पोलिस यूपीला पोहोचले. मात्र, राजभर लपून बसल्यामुळे त्याला शोधणे कठीण झाले. अशा परिस्थितीत, पोलिसांनी कल्पकता दाखवत स्थानिक वीटभट्टीत मजूर म्हणून नोकरी स्वीकारण्याचा अनोखा निर्णय घेतला आणि गुन्हेगाराचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली.
ऑगस्ट २०२३ मध्ये डोंबिवलीतील एका रहिवाशाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तो आपल्या गावी जाऊन परत आला असता, घरफोडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. सोनं आणि चांदीचे दागिने मिळून तब्बल २१.२६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि राजेश राजभर या संशयिताचा शोध घेतला. तो घरफोडी व चोऱ्यांसाठी कुख्यात गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते.राजभर हा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी यूपी गाठले. मात्र, तो लपून बसल्यामुळे सरळ त्याच्या मागे जाणे शक्य नव्हते.
वीटभट्टीत मजूर बनून पोलिसांचा मास्टरप्लॅन!
राजभरला अटक करण्यासाठी पोलिसांनी संशय न येण्यासाठी अनोखी युक्ती लढवली. आझमगडमधील एका गावात वीटभट्टीत कामगार म्हणून दाखल झाले. या भागात देशभरातून मजूर कामासाठी येत असल्यामुळे, तीन अनोळखी मजूर आल्याने कोणालाही संशय आला नाही. दहा दिवस स्थानिकांसोबत संवाद साधून आणि माहिती गोळा करून त्यांनी राजभरचा अड्डा शोधून काढला. योग्य संधी मिळताच त्याला अटक करून थेट मुंबईत आणले.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजभर डोंबिवली, ठाणे, पालघर आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये २० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सामील होता. यापूर्वीही काही प्रकरणांत त्याला अटक करण्यात आली होती, मात्र नंतर तो जामिनावर सुटला होता.डोंबिवली पोलिसांच्या चतुराई आणि कल्पकतेमुळे मोठा गुन्हेगार अखेर गजाआड गेला.


Leave a Reply