पुण्यात उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या गर्भवती तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ५ लाखांच्या मदतीला नकार दिला आहे. मदतीपेक्षा दोषी डॉक्टर व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मंगेश चिवटे यांनी बुधवारी भीसे कुटुंबीयांची भेट घेतली. “अशा दुःखद प्रसंगी भेट व्हावी, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली होती. मात्र, कुटुंबीयांनी ती अत्यंत सन्मानाने नाकारली,” अशी माहिती चिवटे यांनी दिली.
न्यायासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट मागितली
मदतीऐवजी, भीसे कुटुंबीयांनी एकनाथ शिंदेंची थेट भेट मागितली असून, पुढच्या आठवड्यात ही भेट होणार आहे, असेही चिवटे यांनी स्पष्ट केले.२८ मार्च रोजी ईश्वरी भीसे यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, कुटुंबीयांकडून उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांना सूर्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे २९ मार्च रोजी त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला.मात्र,प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण ३१ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली. “तनिषासाठी न्याय मिळणं हेच कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे, पैसे नव्हे,” असं भीसे कुटुंबीयांचे जवळचे मित्र स्वप्निल नाहर यांनी सांगितलं.
Leave a Reply