काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. मात्र, निवडणूक आयोगाने आम्हाला केवळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतचीच मतदानाची आकडेवारी दिली.
त्यानंतरच्या अवघ्या दोन तासांत ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले, जे शक्य नसल्यासारखे वाटते. एका मतदारास सरासरी तीन मिनिटे लागतात, त्यामुळे ही संख्या अतिशय शंकास्पद आहे.”ते पुढे म्हणाले, “आम्ही आयोगाकडे मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्याची विनंती केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले, यावरून आयोगाने तडजोड केल्याचे स्पष्ट होते.” असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची, भारतीय लोकशाहीची आणि संविधानिक संस्थांची प्रतिमा मलिन करत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. निवडणुकांमध्ये वारंवार पराभव झाल्याने त्यांचा मानसिक समतोल ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे.” फडणवीस पुढे म्हणाले, “एक विरोधी पक्षनेता म्हणून जर ते परदेशात आपल्या देशाची प्रतिमा मलिन करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, ते नेमके कोणाच्या अजेंड्यावर काम करत आहेत?”
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना सल्ला दिला की, “जनतेत जाऊन काम करणे आवश्यक आहे. देशभर भ्रमंती करून भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करून जनतेचा विश्वास संपादन करता येणार नाही. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली येथील पराभवानंतर त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. भारताची सातत्याने होणारी बदनामी तात्काळ थांबवावी.”
Leave a Reply