मुंबई उपनगरातील बालकांमध्ये वाढत्या कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी दिले आहेत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी आणि दहा दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुरुवारी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणावर उपाययोजना आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी धोरणांवर चर्चा करण्यात आली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पोषण ट्रॅकर अॅपद्वारे २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची उंची व वजन तपासले असता, १३ हजार ४५७ बालके मध्यम तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत तर २ हजार ८८७ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कुपोषित बालकांच्या सखोल तपासणीस गती दिली असून, लवकरच नव्या शहरी बालविकास केंद्रांची स्थापना करण्याची योजना आखण्यात आली आहे. पालकमंत्री आशीष शेलार यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली असून, बालकांचे पोषण व आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
Leave a Reply