पुणे राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या उद्रेकामुळे दुसऱ्या संशयित मृत्यूची नोंद झाली असून बाधित रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित महिला तोंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होती.
महिलेने सुरुवातीला अशक्तपणाची तक्रार केल्याने १५ जानेवारी रोजी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्यानंतर दोन दिवसांनी तिला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. २८ जानेवारी रोजी सेप्सिसमुळे श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचे निधन झाले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, “मृत्यू ऑडिट समिती या प्रकरणाचा आढावा घेऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करेल.”
राज्यात GBS-संबंधित पहिला मृत्यू २५ जानेवारी रोजी झाला होता. पुण्याच्या धायरी परिसरात राहणाऱ्या सोलापूर येथील ४० वर्षीय पुरुषाचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.
दूषित पाणी संभाव्य कारण
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काही दिवसांपूर्वीच GBS चा उद्रेक दूषित पाण्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त केली होती. राज्यभरातील आठ जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता ते जैविक अशुद्धतेसाठी सकारात्मक आढळले आहेत.
GBS संशयित एकूण १२७ प्रकरणांपैकी ७२ जणांचे निदान झाले असून पुणे आणि परिसर हा या साथीचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. आतापर्यंत चाचणीसाठी पाठवलेल्या १२१ स्टूल नमुन्यांपैकी २१ नमुने नोरोव्हायरस आणि ५ नमुने कॅम्पिलोबॅक्टर व्हायरससाठी सकारात्मक आढळले आहेत.
रहिवाशांना स्वच्छ पाणी वापरण्याचा सल्ला
GBS च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून घरोघरी पाहणी सुरू असून आतापर्यंत ५०,००० हून अधिक घरे तपासण्यात आली आहेत. नागरिकांना पाणी उकळून आणि स्वच्छ करून पिण्याचा तसेच स्वच्छता राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही रुग्णांच्या जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आढळला आहे. हा जीवाणू GBS च्या जागतिक स्तरावरील एक तृतीयांश प्रकरणांसाठी कारणीभूत ठरतो आणि अनेकदा गंभीर संसर्गास कारणीभूत असतो.
GBS हा एक दुर्मिळ पण उपचारयोग्य आजार आहे. यात शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली चुकून मज्जातंतूंवर हल्ला करते, ज्यामुळे अशक्तपणा, पक्षाघात किंवा इतर लक्षणे दिसून येतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ८०% रुग्णांना उपचारानंतर सहा महिन्यांत चालण्याची क्षमता पुन्हा मिळते, मात्र काही गंभीर रुग्णांना पूर्णतः बरे होण्यासाठी एक वर्ष किंवा अधिक कालावधी लागू शकतो.
GBS च्या उपचाराचा खर्चही मोठा असून बहुतेक रुग्णांना इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) इंजेक्शन्सचा कोर्स घ्यावा लागतो. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे.
Leave a Reply