अहमदाबाद : गुजरातमध्ये नोंदणीकृत १० लहान-गुमनाम राजकीय पक्षांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ४३०० कोटी रुपयांचा चंदा मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या पक्षांनी प्रत्यक्षात निवडणुकीसाठी केवळ ३९ लाखांचा खर्च दाखवला असून, सादर केलेल्या अहवालांमध्ये एकूण खर्च ३५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखवण्यात आला आहे. राहुल गांधींनी या बातमीची प्रत आपल्या एक्स अकाउंटला टाकून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, या पक्षांना २०१९ ते २०२४ या कालावधीत प्रचंड निधी मिळाला. याच काळात राज्यात दोन लोकसभा निवडणुका (२०१९ व २०२४) आणि एक विधानसभा निवडणूक (२०२२) झाल्या होत्या. तथापि, या दहा पक्षांनी निवडणूक लढवताना फारच थोडे उमेदवार उभे केले. काहींना तर मोजकेच मते मिळाली, तरीदेखील त्यांच्या खात्यात शेकडो-हजारो कोटी रुपयांचा चंदा जमा झाला.
‘लोकतांत्रिक सत्ता पार्टी’ला सर्वाधिक १०४५ कोटी रुपये चंदा मिळाला, तर ‘भारतीय नेशनल जनमत दल’ला ९६२ कोटी रुपये मिळाले. याशिवाय ‘मानवाधिकार भारतीय पार्टी’, ‘न्यू इंडिया युनायटेड पार्टी’, ‘भारतीय श्रमिक पार्टी’, ‘जनपरिषद’ आदी पक्षांनाही मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळाल्या. मात्र, या सर्व पक्षांचा प्रत्यक्ष निवडणूक खर्च अत्यंत किरकोळ होता. उदाहरणार्थ, जनपरिषद पक्षाने २४९ कोटींचा चंदा मिळाल्यानंतर फक्त १५ उमेदवार उभे केले आणि १४ लाख खर्च दाखवला.
या प्रकरणामुळे निवडणुकीतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत या गुमनाम पक्षांना मिळालेला चंदा प्रचंड असल्याने निधीच्या स्रोतांबद्दल शंका निर्माण होत आहे. निवडणुकीत खर्च न करता कोट्यवधी-हजारो कोटी रुपयांचा निधी दाखवण्यामागे नेमकं काय चाललं आहे, याची चौकशी करण्याची मागणी वाढत आहे.
Leave a Reply