मुंबईत आज शक्तिप्रदर्शन; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचा अंधेरीत आणि शिंदे गटाचा बीकेसीत मेळावा

विधानसभा निवडणुकीतील यश-अपयश विसरून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दोन्ही गट मुंबईत मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मेळावा होणार आहे, तर शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
अलीकडील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीतील अपयशामुळे पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा न केल्यानेही पक्षातील नाराजी वाढली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यात शिवसैनिकांशी थेट संवाद साधून पक्षाची पुढील दिशा स्पष्ट करतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा झाली असली, तरी उद्धव ठाकरे यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे आत्मविश्वासाने भारावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता स्थानिक निवडणुकांवर भर देत आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित ‘शिवोत्सव’ या मेळाव्यात शिंदे गट आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच, या मेळाव्यात ठाकरे गटातील काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट सज्ज होत आहेत. शिंदे गट महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. तर उद्धव ठाकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याने त्यांच्या आजच्या भाषणाकडे शिवसैनिक आणि राजकीय निरीक्षक दोघांचेही लक्ष आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *