भायखळा येथील राणीचा बागेच्या आवारात असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या नूतनीकरणानंतर वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती. तसेच, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्यासह स्थानिक खासदार आमदारांची उपस्थिती होती.
१९२ वर्षांचा वारसा, १८ महिन्यांत नूतनीकरण पूर्ण
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या १९२ वर्षे जुन्या वास्तूचे नूतनीकरण मार्च २०२३ मध्ये सुरू करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने १८ महिन्यांत हे काम पूर्ण केले. या नूतनीकरण प्रकल्पासाठी सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये छताच्या जलरोधक दुरुस्त्या, आतील व बाह्य प्लास्टर दुरुस्त्या, नक्षीकामाची पुनर्बांधणी, खिडक्यांची डागडुजी, रंगकाम, कठडे आणि रॅम्पच्या कामांचा समावेश होता. या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय
मुंबईतील कला, इतिहास व सांस्कृतिक वारसा उलगडणारे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे शहरातील सर्वात जुने संग्रहालय आहे. लंडनमधील १८५१ च्या जागतिक प्रदर्शनामुळे या संग्रहालयाची संकल्पना उदयास आली. १८५५ साली व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावाने स्थापन झालेले हे संग्रहालय १८७२ पासून विद्यमान इमारतीत सुरू आहे. १९७५ मध्ये डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या सन्मानार्थ या संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले.
संग्रहालयातील अनमोल ठेवा
या संग्रहालयात मातीची लघुशिल्पे, ऐतिहासिक नकाशे, पाषाण मुद्रांक, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके यांसारख्या अनमोल वस्तूंचा खजिना आहे. संग्रहालय सहा विभागांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये मुंबईचा इतिहास, औद्योगिक व कला क्षेत्रातील प्रदर्शन, १९व्या शतकातील चित्रे आणि विशेष प्रदर्शनांचा समावेश आहे. २००५ साली डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाला युनेस्कोचा सांस्कृतिक संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठीही या संग्रहालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संग्रहालयाच्या मुख्य इमारतीतील कमलनयन बजाज विशेष कला दालनात विविध प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे केवळ इतिहास व कला यांचे जतन करणारे केंद्र नसून, नाट्य, कार्यशाळा, संगीत, चित्रपट व चर्चासत्रांच्या माध्यमातून मुंबईच्या सांस्कृतिक आयुष्याला एक नवी दिशा देणारे ठिकाण ठरले आहे.
Leave a Reply