नौदलाच्या ताकदीत वाढ; १५ जानेवारीला तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण; इस्कॉन मंदिराचेही लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण आणि नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. सकाळी सुमारे १०:३० वाजता मुंबईतील नौदल गोदीत पंतप्रधान आयएनएस सुरत (INS Surat), आयएनएस निलगिरी (INS Nilgiri), आणि आयएनएस वाघशीर (INS Vaghshir) या नौदलाच्या युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता नवी मुंबईच्या खारघर येथे असलेल्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील.

तीन युद्धनौकांचे वैशिष्ट्य काय?
तीन प्रमुख युद्धनौकांच्या लोकार्पणामुळे संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात भारताने घेतलेली महत्त्वाची झेप अधोरेखित होते.
• आयएनएस सुरत (P१५B) हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वाधिक प्रगत जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून, अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
• आयएनएस निलगिरी (P१६A) हे स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून, भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने विकसित केले आहे. यामध्ये सागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक स्टील्थ वैशिष्ट्ये आहेत.
• आयएनएस वाघशीर (P७५) स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. फ्रान्सच्या सहकार्याने विकसित केलेली ही पाणबुडी भारताच्या प्रगत तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे.

इस्कॉन मंदिराचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघर, नवी मुंबई येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या इस्कॉन प्रकल्पाचे उद्घाटन करतील. नऊ एकरांवर विस्तारलेल्या या प्रकल्पामध्ये अनेक मंदिरे, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्राचा समावेश आहे. वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट शांतता, विश्वबंधुत्व, आणि सौहार्द वाढवणे आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *