दिशा सालियनच्या (Disha Salian) रहस्यमय मृत्यू प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून, नुकताच उघड झालेल्या मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या अहवालानुसार, दिशाच्या आत्महत्येस अप्रत्यक्षपणे तिच्या वडिलांची भूमिका असल्याचे संकेत आहेत.
मालवणी पोलिसांच्या तपास अहवालानुसार, दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे तिच्यावर मोठा आर्थिक भार पडत होता. तिचे उत्पन्न संबंधित व्यक्तींना मदतीसाठी खर्च होत असल्याने ती मानसिक आणि आर्थिक तणावात होती. या परिस्थितीमुळे दिशाने मित्रांशी चर्चा केली होती आणि शेवटी या तणावातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद आहे. दिशाच्या मृत्यूनंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे सतीश सालियन आता संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. क्लोजर रिपोर्ट समोर आल्यानंतर, संशयाची सुई आता त्यांच्यावर वळली आहे.
दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि तिच्या आर्थिक तणावासंदर्भात क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख आहे, मात्र मुंबई पोलिसांनीच हा रिपोर्ट मागे घेतला असल्याने तो कायदेशीरदृष्ट्या वैध ठरत नाही, असा सवाल सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी उपस्थित केला आहे. तसेच, एसआयटी (SIT) चौकशी सुरू असल्यामुळे या रिपोर्टचा कोणालाही फायदा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिशाच्या मित्र रोहन राय याने 2022 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, दिशा प्राण्यांच्या हक्कांसाठी संवेदनशील होती. केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. त्यामुळे ती नैराश्यात गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिस अहवालात तिच्या वडिलांच्या अफेअरमुळे ती नैराश्यात गेल्याचे नमूद आहे.
8 जून 2020 रोजी दिशाचा मृत्यू झाला होता, मात्र तिचे शवविच्छेदन तीन दिवसांनंतर करण्यात आले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या – हात, पाय आणि छातीवर गंभीर जखमेचे निशाण होते. विशेषतः, डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, तिच्यावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मालवणी पोलिसांच्या तपासावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. “पोलिसांनी तयार केलेले पुरावे पाहता, त्यांना नोबेल पुरस्कारच द्यायला हवा!” अशा शब्दांत वकील निलेश ओझा यांनी पोलिसांवर टीका केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उघड झालेल्या नव्या तपशीलांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. आता एसआयटीच्या चौकशीत कोणते नवे खुलासे होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply