प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप

शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे. यासाठी त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी त्यांच्या या मागणीला जोरदार आक्षेप घेतला असून, परदेशात गेल्यास ते पुन्हा भारतात न परतण्याची शक्यता असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एनआयएने न्यायालयात आपली भूमिका मांडताना सांगितले की, प्रा. तेलतुंबडे यांना परदेश प्रवासाची परवानगी दिल्यास, त्यांनी परत येण्यास नकार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही काही आरोपी परदेशात स्थायिक झाले असून, त्यांना परत आणताना कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही भूमिका घेण्यात येत असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे.

प्रा. तेलतुंबडे यांनी थेट उच्च न्यायालयात परवानगीसाठी अर्ज केला असला, तरी प्रक्रियेनुसार त्यांना सर्वप्रथम विशेष एनआयए न्यायालयात अर्ज करणे आवश्यक होते, असेही एनआयएने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सादर केलेली याचिका प्रक्रियात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असे यंत्रणेचे म्हणणे आहे.

एनआयएच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची पुढील सुनावणी योग्य खंडपीठासमोर घेण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या महानिबंधक कार्यालयाला दिले आहेत. या प्रकरणात अंतिम निर्णय संबंधित खंडपीठाच्या पुढील सुनावणीनंतर घेतला जाणार असून, प्रा. आनंद तेलतुंबडे यांना परदेश दौऱ्यास परवानगी मिळणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *