रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, थंडीच्या मोसमातही जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली, मात्र त्यानंतर महायुतीतील वाद अधिकच चिघळला.
शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तटकरे यांच्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही, असा आक्षेप आमदार भरत गोगावले यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर “आमचे आरोप खोटे ठरले, तर मी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा देईन,” असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आघाडी-युतीच्या राजकारणात प्रत्येकाला सर्वकाही मिळेलच असे नाही. काही मतभेद असले तरी त्यावर चर्चा होऊ शकते. पण निराधार आरोप करून राजकारण करणे योग्य नाही,” असे प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिले. तर आदिती तटकरे यांनी “पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. पदाची अपेक्षा असणे गैर नाही, पण ती योग्य रीतीने व्यक्त होणे गरजेचे आहे,” असा टोला शिवसेना आमदारांना लगावला.
शिवसेना आमदारांचा रोष आदिती तटकरे यांच्याऐवजी सुनील तटकरे यांच्यावर अधिक आहे, हे स्पष्ट झाले आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी तर थेट इशाराच दिला “तटकरेंच्या बाबतीत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही!” यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही आमदारांना आवरण्याचे निर्देश दिले आहेत. पण हा वाद आता थांबणार की अधिकच विकोपाला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रायगडमध्ये राजकीय रणसंग्राम; पालकमंत्रीपदाच्या वादामुळे महायुतीत तणाव शिगेला
•
Please follow and like us:
Leave a Reply