मुंबई : मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया हे जवळचे मित्र आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मोरिया यांची अलिकडेच चौकशी केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या दोन मध्यस्थांशी बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया यांचे संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
प्रकरण काय आहे?
मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीतून गाळ काढण्याशी संबंधित ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. असा आरोप आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांनी गाळ काढण्याच्या कंत्राटासाठी निविदा तयार केली होती, जेणेकरून कामासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचा एका विशिष्ट पुरवठादाराला फायदा होईल.
संजय निरुपम म्हणाले, “२६ मे रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडला. पाणी साचल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, परंतु मुंबईत पाणी साचण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे नाल्याची स्वच्छता आणि दुसरी म्हणजे मिठी नदी. २००५ मध्ये २६ जुलै रोजी ९०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. त्यानंतर ठाकरे कुटुंब बाळासाहेबांना सोडून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले, परंतु परवा एकनाथ शिंदे स्वतः नियंत्रण कक्षाची पाहणी करत होते”, असं निरुपम म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कंत्राट देत असत – संजय निरुपम
ते म्हणाले, ”२००५ पासून मिठी नदीच्या स्वच्छतेवर १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. १८ वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिठी नदीच्या स्वच्छतेचे काम देण्यात आले होते. २००५ ते २०२२ पर्यंत शिवसेना बीएमसीमध्ये सत्तेत होती आणि “मातोश्रीच्या परवानगीशिवाय कंत्राटे दिली जात नव्हती. मातोश्रीवरून कंत्राटे दिली जात होती, उद्धव ठाकरे आणि आदित्य कंत्राटे देत होते” असा आरोप देखील संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम म्हणाले, “EOW चौकशीत चित्रपट अभिनेता दिनो मोरियाचे नाव आले, मिठी नदीच्या स्वच्छतेशी अभिनेत्याचा काय संबंध आहे? दिनो मोरिया आदित्य ठाकरे यांच्या जवळचा आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशाच्या वडिलांनी दिनो मोरिया आणि आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दोघांचेही जवळचे संबंध होते.” ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी दिनो मोरियाला मुंबईत ओपन जिम उघडण्याचे कंत्राट दिले होते. दिनो मोरियाची चौकशी सुरू आहे, त्यांच्या भावाची चौकशी सुरू आहे, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे. मुंबईत पूर येतो, पाणी साचते, यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. मातोश्रीची भूमिका आहे. आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave a Reply