प्रयागराज गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या भव्य महाकुंभमेळ्याची आज महाशिवरात्रीच्या दिवशी सांगता झाली. अंतिम पवित्र स्नानाचा सोहळा त्रिवेणी संगमावर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पार पडला. सूर्यास्ताच्या साक्षीने या महास्नानाची ड्रोनद्वारे टिपलेली भव्य दृश्ये समोर आली आहेत.
महाकुंभचा प्रवास : ४५ दिवसांचा धार्मिक उत्सव
महाकुंभमेळ्याचा शुभारंभ १३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेला झाली होती. आज, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली. पहाटे सहा वाजल्यापासून स्नानासाठी भाविकांनी संगमावर गर्दी केली होती. संपूर्ण दिवसभरात तब्बल ४० लाख भाविकांनी पवित्र स्नान करून कुंभमेळ्यातील अंतिम स्नानाचा लाभ घेतला. या ४५ दिवसांच्या काळात ६५ कोटीहून अधिक भाविकांनी संगमस्नान केले. भारतासह परदेशांतूनही हजारो श्रद्धाळू प्रयागराजला पोहोचले, ज्यामुळे हा मेळा जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक ठरला.
महाकुंभच्या कालावधीत सहा प्रमुख स्नान सोहळे पार पडले, ज्यात तीन शाही स्नान समाविष्ट होते.
• पौष पौर्णिमा (कुंभमेळ्याची सुरुवात) – १३ जानेवारी
• मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान) – १४ जानेवारी
• मौनी अमावस्या (दुसरं शाही स्नान) – २९ जानेवारी
• वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान) – ३ फेब्रुवारी
• माघी पौर्णिमा (मुख्य स्नान) – १२ फेब्रुवारी
• महाशिवरात्री (अंतिम स्नान) – २६ फेब्रुवारी
महाकुंभमध्ये विविध संप्रदायांच्या साधू-संतांच्या आखाड्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेषतः निरंजनी आखाडा, आहवान आखाडा आणि जुना आखाडा (संन्यासी परंपरेतील सर्वात मोठा आखाडा) यांचा यात समावेश होता. तसेच, अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनीही महाकुंभाला भेट दिली.
महाकुंभ स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी १५,००० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, ज्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू
२६ जानेवारी रोजी मौनी अमावस्या स्नानासाठी लाखो भाविक एकत्र आल्याने प्रशासनावर ताण वाढला आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ३० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता. अनेक भाविक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि संसदेतही याचे पडसाद उमटले.
महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा दर्शवणारा जगातील सर्वांत मोठा मेळा आहे. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेच्या या महायज्ञात कोट्यवधी भाविक सहभागी झाले आणि पवित्र स्नान करून आपल्या धर्मपरंपरेला उजाळा दिला. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सूर्यास्ताच्या साक्षीने या ऐतिहासिक महाकुंभाची सांगता झाली.
Leave a Reply