शीव पश्चिमेतील इंदिरा मार्केट परिसर, विशेषतः रोड क्रमांक २१, सध्या अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हैराण झाला आहे. या वाढत्या समस्येमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून परिसरात वाहतूक कोंडीचे गंभीर स्वरूप दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी महापालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या अधिकृत नोंदींनुसार इंदिरा मार्केटमध्ये केवळ ८२ अधिकृत स्टॉल्स आहेत. मात्र प्रत्यक्षात या संख्येपेक्षा कित्येक पट अधिक अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाले पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करताना दिसत आहेत. या अतिक्रमणामुळे रोड क्रमांक २१ व इंदिरा मार्केट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या पालकांना, तसेच वृद्ध आणि महिलांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणेही अवघड झाले आहे. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, वाहनचालक व स्थानिकांमध्ये रोज वादविवाद होत असल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि मंडई परिसरातील १०० ते १५० मीटर अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. इंदिरा मार्केटही या संवेदनशील क्षेत्रात मोडते. त्यामुळे महापालिकेला कारवाई करण्याचा स्पष्ट अधिकार असूनही, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, अशी तक्रार शिरवडकर यांनी केली आहे. एफ उत्तर विभागाचे नवनियुक्त सहायक आयुक्त या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करतील, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, “जर या अनधिकृत फेरीवाल्यांना तत्काळ हटवले गेले, तर वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकते.”
इंदिरा मार्केट परिसरातील व्यापारी, नागरिक आणि शाळकरी मुलांचे पालक या अतिक्रमणामुळे त्रस्त झाले असून, प्रशासनाने यावर त्वरित ठोस कारवाई करावी, अशी आर्जवपूर्ण मागणी आता जोर धरू लागली आहे. या भागातील अनुशासन आणि सुरक्षितता राखण्यासाठी महापालिकेने निर्णायक पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Leave a Reply