“काँग्रेसचे नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत”, भाजप नेत्याचा आरोप

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच काँग्रेसचे काही नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत,अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे.भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला असून, त्यांनी म्हटले की “काँग्रेस नेत्यांच्या बेजबाबदार विधानांचा वापर पाकिस्तान भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी करत आहे. रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार, कर्नाटकचे मंत्री आर. बी. तिम्मापूर, आणि प्रियांका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची विशेषतः नावे घेतली आणि त्यांच्यावर पाकिस्तानला अप्रत्यक्ष पद्धतीने मदत केल्याचा आरोप केला.

भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट प्रश्न विचारला की, त्यांचे अशा नेत्यांच्या वक्तव्यावर काही नियंत्रण आहे का?या वक्तव्यामुळे देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून, काँग्रेसची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का? की दोघांनीही औपचारिक टिप्पण्या केल्या आणि इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे?,” असा संतप्त सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.

शनिवारी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर भारताच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, युद्धाची गरज नाही. देशभर शांतता नांदली पाहिजे. केंद्राने लोकांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा बळकट करावी, असे ते म्हणाले होते. या टीकेनंतर, भाजपने सिद्धरामय्या यांना ‘पाकिस्तान रत्न’ असे संबोधणाऱ्या पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांकडे लक्ष वेधले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण जारी केले की, युद्ध हा नेहमीच शेवटचा उपाय असावा आणि शत्रूला पराभूत करण्याचे इतर सर्व मार्ग अपयशी ठरले तरच ते वापरले पाहिजे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात असताना, काँग्रेसचे काही नेते आपल्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फोडत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी म्हटले की,पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी. दहशतवाद्यांना इतका वेळ असतो का की ते लोकांना त्यांचा धर्म विचारतात? काही लोक म्हणतात की हे घडलंच नाही. दहशतवाद्यांना कुठलाही धर्म किंवा जात नसते. जबाबदारांना शोधा आणि कारवाई करा – हीच देशाची भावना आहे,” असे त्यांचे विधान होते.

त्याचबरोबर कर्नाटकचे मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी देखील म्हटले की,गोळीबार करणारा माणूस धर्म विचारेल का? तो फक्त गोळीबार करेल आणि निघून जाईल. व्यावहारिक विचार करा. तो तिथे उभा राहून धर्म विचारणार नाही आणि मग गोळी झाडणार नाही,” असे विधान करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला.या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजपा आणि इतर विरोधकांकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. अशा संवेदनशील क्षणी केलेली वक्तव्ये देशाच्या सुरक्षेच्या चर्चेऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोपातच विषय भरकटवतात, अशी सार्वत्रिक भावना आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *