भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करून भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. डॉ. आंबेडकर जयंतीच्या तयारीबाबत गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव चहल, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा. सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात.
गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता, उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, आणि वैद्यकीय सुविधा अशा सर्व बाबींची तयारी उच्च दर्जाची असावी. दादर परिसरातील वाहतूक नियंत्रण, सूचना फलकांची मांडणी आणि बेस्टच्या वतीने दादर ते चैत्यभूमी दरम्यान अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. मुंबई महापालिकेने संपूर्ण नियोजनाचा सविस्तर आराखडा यावेळी सादर केला.
Leave a Reply