रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असतानाच आणि या नियुक्तींना तात्पुरती स्थगिती देण्यात आली असतानाही, रायगड येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तर नाशिक येथे गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
पालकमंत्री नियुक्तीवरून वाद
राज्यातील महायुती सरकारने १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात वाद निर्माण झाला. रायगड जिल्ह्यातील महाड येथे हा वाद तीव्र स्वरूपात पाहायला मिळाला. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमलेल्या आदिती तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली.
१९ जानेवारीच्या रात्री गोगावले समर्थकांनी आदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाडजवळील नडगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळून महामार्ग दोन तास ठप्प केला. यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र सुरू केले. या वादामुळे राज्य शासनाने रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तींना तात्पुरती स्थगिती देणारा आदेश जारी केला.
या वादानंतरही रायगड येथे आदिती तटकरे तर नाशिक येथे गिरीश महाजन यांच्याकडून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने २० जानेवारी रोजी राज्याचे अवर सचिव सुनील सोनार यांच्या आदेशाने यासंबंधी परिपत्रक जारी केले.

रायगडला तटकरे, नाशिकला महाजन; प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची जबाबदारी निश्चित
•
Please follow and like us:
Leave a Reply